धाड (हॅलो बुलडाणा) धाड परिसरात व्यवसायिकांना धमकावून हप्ता उकळणाऱ्या गॅंगची धाड पोलिसांनी अक्षरशः धिंड काढत गुंडगिरीला जबरदस्त चाप लावला आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून ठाणेदार प्रताप भोस यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा तालुक्यातील दुधा येथील रहिवासी पवन राजेंद्र सोनुने (वय ३०) यांचे धाड येथे गुरांच्या औषधांचे मेडिकल आहे. दि. ६ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास ते मेडिकलकडे जात असताना चार जणांनी त्यांना जगदंबा स्वीट मार्टसमोर अडवले. धाडमध्ये व्यवसाय करायचा असेल तर आम्हाला हप्ता द्यावा लागेल, अशी दमदाटी करत त्यांना मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर धाड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, याच गॅंगमधील आरोपींनी आणखी दोन हॉटेल व्यावसायिकांना धमकावत हप्त्याची मागणी केल्याची चर्चा परिसरात रंगली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र ठाणेदार प्रताप भोस यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपींना अटक केली.
अक्षय जीवनलाल बिलांगे, रौशन गणेश शिंदे आणि राहुल दळवी या तिघांची मुख्य बाजारपेठेतून धिंड काढण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईने गुंडांची दहशत मोडीत निघाली असून धाडमध्ये गुंडगिरी चालणार नाही असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.
धाड पोलिसांच्या या कडक भूमिकेमुळे व्यापाऱ्यांचे मनोबल उंचावले असून परिसरात कायद्याचा धाक पुन्हा निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.










Total Users : 3291266