डोणगाव (हॅलो बुलडाणा/अनिल राठोड) बंजारा समाजाचे आराध्य दैवत क्रांतीवीर संत सेवालाल महाराज यांची २८७ वी जयंती १५ फेब्रुवारी रोजी डोणगाव येथे अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील प्रमुख चौक, सार्वजनिक स्थळे आणि ग्रामपंचायत कार्यालय परिसर भगव्या पताकांनी आणि घोषणांनी दुमदुमून गेला होता. सकाळी ध्वजपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष शैलेशभाऊ सावजी यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. शिवसेना (उबाठा) गटाचे निबाजी पांडव, भाजपा विद्यार्थी जिल्हाध्यक्ष विलास परमाळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन गाभणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संत सेवालाल महाराजांचा विचार समाजाला एकजुटीची ताकद देणारा आहे, असा सूर यावेळी उमटला.
ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच चरण पाटील आखाडे यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र कार्यक्रम पार पडला. उपसरपंच श्याम इंगळे, माजी सरपंच जुबेर खान व इतर मान्यवरांनी महाराजांना अभिवादन केले.
नाईक अनिल राठोड, कारभारी सतीश राठोड व संदीप राठोड यांच्या परिश्रमातून सोहळा यशस्वी झाला. गावकरी आणि बंजारा समाजबांधवांच्या शिस्तबद्ध उपस्थितीमुळे डोणगावात भक्ती, ऐक्य आणि उत्साहाचे अनोखे चित्र पाहायला मिळाले.










