बुलढाणा (हॅलो बुलडाणा/सचिन जयस्वाल) प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांच्या उर्वरीत हप्त्यांचा प्रश्न प्रलंबित राहिल्याने रायपूर येथील लाभार्थ्यांचा संयम अखेर संपला असून आज त्यांनी प्रशासनाविरोधात आक्रमक आंदोलन छेडले. वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने लाभार्थ्यांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला.
शमीम सौदागर, निलेश राजपूत यांच्यासह अनेक लाभार्थ्यांना केवळ एक किंवा दोनच हप्ते मिळाल्याने घर बांधकाम अर्धवट अवस्थेत थांबले आहे. दरम्यान, तात्पुरत्या निवासासाठी भाड्याने राहावे लागत असल्याने आर्थिक अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. प्रशासनाने सात दिवसांत हप्ते वितरीत न केल्यास कुटुंबासह रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा दिला होता; मात्र मुदत उलटूनही निर्णय न झाल्याने आज प्रत्यक्ष आंदोलन करण्यात आले.
आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत लाभार्थ्यांनी “घरकुल द्या, न्याय द्या” अशी मागणी लावून धरली. प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र टीका करत तातडीने निधी वितरीत करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून प्रशासन आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










