छत्रपती संभाजीनगर (हॅलो बुलडाणा) हर्सलजवळील जुना जकात नाक्याजवळ भरधाव कारने उडवलेल्या भीषण अपघातात बुलढाणा जिल्ह्यातील २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याने संताप व्यक्त होत आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकाला धडकली आणि तीन वेळा उलटून थेट पादचारी तरुणांवर कोसळली. सोमवारी (९ फेब्रुवारी) पहाटे दोनच्या सुमारास हा थरारक अपघात घडला.
अनिकेत दिलीप निंबाळकर (रा. लांजूळ, ता. खामगाव) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून त्याचा मित्र मनोज भिलन गंभीर जखमी झाला आहे. केटरिंगचे काम आटोपून घरी परतताना हा दुर्दैवी प्रसंग ओढवला. मंगेश गोविंदराव कोलते (रा. मयूर पार्क) चालवत असलेली कार अचानक अनियंत्रित होऊन २० ते ३० फूट उडत तरुणांवर आदळल्याने घटनास्थळीच अनिकेतचा जीव गेला.
शिक्षणासाठी संघर्ष करणारा अनिकेत एमएसडब्ल्यूचे शिक्षण घेत होता आणि कुटुंबाला हातभार लावण्यासाठी सुटीच्या दिवशी काम करायचा. या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत असून निष्काळजी वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.










