डोणगाव (हॅलो बुलडाणा/अनिल राठोड) शासनाकडून गोरगरीबांसाठी येणाऱ्या रेशन धान्याच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा धक्कादायक प्रकार डोणगाव येथे उघडकीस आला आहे. येथील रेशन दुकानातून लाभार्थ्यांना दिली जाणारी ज्वारी आणि तांदूळ अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून ते खाण्यायोग्य नसल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. ज्वारीमध्ये कचरा, धूळ, किडे तर तांदळाचीही अवस्था अत्यंत खराब असल्याने आम्ही नेमके काय खायचे? असा आक्रोश ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धान्याचे वाटप २० तारखेला होणे अपेक्षित होते. मात्र ‘ज्वारीची चाळणी करायची आहे’ असे कारण देत प्रशासनाने सहा-सात दिवस वाटप लांबणीवर टाकले. आश्चर्य म्हणजे, इतका विलंब करूनही ज्वारीची कोणतीही स्वच्छता न करता धान्य ‘जैसे थे’ वाटप करण्यात आल्याचा आरोप होत आहे. उशिरा मिळालेले धान्यही निकृष्ट असल्याने लाभार्थ्यांचा संताप अनावर झाला आहे.
गरिबांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या प्रकाराची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच दर्जेदार धान्य त्वरित उपलब्ध करून द्यावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासन याकडे किती गांभीर्याने पाहते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.










