सुलतानपूर (हॅलो बुलडाणा/मोईन खान)
त्यागाची मूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुलतानपूर येथील श्री शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात प्रबोधन आणि उत्साहाचा महासंग्राम पाहायला मिळाला. भीम गीतांच्या सुरावटी आणि नारीशक्तीच्या सन्मानाने हा सोहळा ऐतिहासिक ठरला असून, परिसरातील हजारो जनसमुदायाने या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
सपनाताई खरात यांच्या आवाजाने सुलतानपूर दुमदुमले कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेल्या टीव्ही फेम गायिका सपनाताई खरात यांनी आपल्या खड्या आवाजात बुद्ध, शिव, फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या विचारांची गाणी सादर केली. “भीमरायाची वाघीण”, “रमाईचा त्याग” यांसारख्या गीतांवर उपस्थित जनसमुदाय मंत्रमुग्ध झाला. प्रबोधनात्मक गीतांच्या माध्यमातून महापुरुषांचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत झाला.
नारीशक्तीचा सन्मान: महिलांचा गौरव
केवळ उत्सव न साजरा करता, समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा ‘भव्य नारीशक्ती सन्मान’ देऊन गौरव करण्यात आला. “ज्याप्रमाणे माता रमाई डॉ. बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या, तसाच आदर्श आजच्या महिलांनी घ्यावा,” असा सूर या कार्यक्रमातून उमटला.
प्रमुख उपस्थिती आणि आयोजक कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आणि नागवंशी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नागवंशी संघपाल पनाड (उपसरपंच) यांनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले.त्यांच्या मार्गदर्शनाखाली नागवंशी सामाजिक संघटन, भीम योद्धा ग्रुप आणि स्टार ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले.










