देऊळगाव मही (हॅलो बुलडाणा/ संतोष जाधव) सोन्याचे दर गगनाला भिडले असतानाच देऊळगाव महीत चोरट्यांनी धाडसी घरफोडी करत शहरातील सुरक्षिततेचा फज्जा उडवला आहे. ४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री सुमारे १.३० वाजताच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी माजी सैनिकांच्या घरावर थेट डल्ला मारला. वार्ड क्रमांक ६ मधील रहिवासी माजी सैनिक रघुनाथ माधव मुजमुले (वय ४९) यांच्या घराचा हॉलचा दरवाजा बाहेरून दोरीने बांधून चोरट्यांनी बेडरूममध्ये प्रवेश केला.
बेडरूममधील कपाटाचे कुलूप तोडून साडेपाच तोळे सोन्याचे दागदागिने, अंदाजे २ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आणि घराच्या पाठीमागील बाजूने पसार झाले. या घटनेने देऊळगाव मही शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. बुलढाणा येथील श्वान पथक व फॉरेन्सिक तज्ज्ञांना पाचारण करून तपास करण्यात आला. या गंभीर चोरी प्रकरणाचा पुढील तपास देऊळगाव राजा ठाणेदार ब्रह्मागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस चौकीचे इन्चार्ज कलीम देशमुख व पोहेकॉ शरद साळवे करत आहेत.










