नांदुरा (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील वडाळी येथे विवाहित महिलेच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली असून पतीकडून होत असलेल्या दीर्घकालीन छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी नांदुरा पोलीस ठाण्यात पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षा जयंत वक्टे (वय ३५) हिचा मृतदेह ३ फेब्रुवारी रोजी शेतातील विहिरीत आढळून आला. तिचा भाऊ संदीप फरपट यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पती जयंत वक्टे याला दारूचे व्यसन असून मागील १५ वर्षांपासून माहेरून पैसे आणण्याचा तसेच शेतीतील हिस्सा नावावर करण्याचा दबाव टाकत वर्षा हिला शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. वारंवार मारहाण व पैशांची मागणी यामुळे वर्षा मानसिक तणावाखाली असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
मृत्यूपूर्वी काही दिवस आधीही पैशांच्या कारणावरून मारहाण झाल्याने वर्षा माहेरी आली होती. नातेवाईकांनी समजूत काढून तिला पुन्हा सासरी पाठवले, मात्र अखेर छळाला कंटाळून तिने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी पती जयंत वामन वक्टे, सासू शांताबाई वक्टे, सासरे वामन वक्टे, जेठ अनंता वक्टे व दिर अमोल वक्टे या पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.










