देऊळगाव मही (हॅलो बुलढाणा/ संतोष जाधव) शहरातील छत्रपती चौक परिसरात आज शनिवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. बांधकामावर पाणी मारत असताना अचानक मेन लाईनच्या विद्युत तारेचा जबर शॉक लागून सेवानिवृत्त कर्मचारी संतोष गंगाराम आरमाळ (वय ६२, रा. शिवणी आरमाळ, ह. मु. देऊळगाव मही) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, संतोष आरमाळ यांचे छत्रपती चौकात नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. नेहमीप्रमाणे सकाळी साडेआठच्या सुमारास ते तिसऱ्या मजल्यावर पूर्ण झालेल्या भागावर पाणी मारण्यासाठी गेले होते. याचवेळी घरासमोरून गेलेल्या विद्युत मेन लाईनच्या तारेचा नकळत संपर्क झाल्याने त्यांना जोरदार विद्युत शॉक बसला. शॉकच्या तीव्रतेमुळे ते थेट तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळले.
घटनास्थळी आरडाओरड होताच जवळील नातेवाईकांनी तातडीने धाव घेऊन त्यांना जखमी अवस्थेत देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी जालना येथील कलावती हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तेथे दाखल करताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
कै. संतोष आरमाळ हे कै. लक्ष्मीबाई माध्यमिक आश्रम शाळा, शिवणी आरमाळ येथील सेवानिवृत्त प्रयोगशाळा परिचर होते. जिल्हा परिषद शाळा अंढेरा (सेवानगर) येथील शिक्षक हरी आरमाळ यांचे ते वडील होत. या दुर्दैवी घटनेने देऊळगाव मही परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून विद्युत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.










