खामगाव (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजवणारी धक्कादायक घटना खामगाव शहरानजीकच्या वाडी परिसरात मध्यरात्री घडली. अग्रवाल कुटुंबाच्या घरावर चार ते पाच सशस्त्र दरोडेखोरांनी थेट धाडसी हल्ला चढवत तलवार व चाकूने बाप-लेकावर जीवघेणा वार केल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.
मयंक अग्रवाल व मनोज अग्रवाल यांच्या घरात मध्यरात्री अज्ञात दरोडेखोरांनी जबरदस्तीने प्रवेश केला. घरात घुसताच दरोडेखोरांनी थेट मनोज अग्रवाल व त्यांचे पुत्र मयंक अग्रवाल यांच्यावर चाकू व तलवारीने सपासप वार केले. रक्तबंबाळ अवस्थेत कोसळलेल्या दोघांचीही प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीने अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात हलवण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे.
ही संपूर्ण थरारक घटना घरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यात चार दरोडेखोर स्पष्टपणे दिसत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी, स्वान पथक आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसर सील करून तपास सुरू करण्यात आला आहे.
मध्यवस्तीतील घरावर अशा प्रकारे सशस्त्र हल्ला झाल्याने खामगाव शहर व परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरोडेखोरांना कायद्याची भीती उरली आहे का? असा थेट सवाल नागरिकांकडून केला जात आहे. पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगितले आहे










