डोणगाव (हॅलो बुलडाणा) ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, दिव्यांगांसाठी राखीव असलेला ५% निधी सन २०१९ पासून जाणीवपूर्वक वाटप न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासनाने स्पष्ट आदेश दिले असतानाही दिव्यांगांच्या हक्काच्या निधीवर डल्ला मारल्याने ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ नुसार प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या स्वउत्पन्नातील ५% निधी दिव्यांगांच्या कल्याणासाठी खर्च करणे बंधनकारक आहे. या निधीतून स्वयंरोजगार, घरकुल, शिक्षण आदी योजनांचा लाभ दिला जातो. मात्र डोणगावात हा निधी वर्षानुवर्षे “कागदावरच” असल्याचे चित्र आहे.
अर्जदार राजू उर्फ युनुस अहमद पुंजानी यांच्यासह अनेक दिव्यांग बांधवांनी सरपंच, उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन देत ४० ते १०० टक्के अपंगत्व असलेल्या पात्र दिव्यांगांना तात्काळ निधी वितरित करण्याची मागणी केली आहे. निधी खर्च न झाल्यास तो जिल्हा परिषदेच्या अपंग कल्याण निधीत जमा करण्याचे शासन निर्देशही धाब्यावर बसवण्यात आले आहेत.
तात्काळ लेखी उत्तर व न्याय न मिळाल्यास आंदोलन व उपोषण छेडण्याचा इशारा देण्यात आला असून, प्रशासनाने वेळेत दखल न घेतल्यास याची मोठी किंमत मोजावी लागेल, असा थेट इशारा दिव्यांगांनी दिला आहे.










