spot_img
spot_img

दोरीने बांधलेले, तहानलेले बैल… पोलिसांमुळे वाचला ५६ जीवांचा श्वास

चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) बुलढाणा-जालना रोडवरील दांडगे लेआऊट परिसरात गोवंश तस्करीचा भयंकर आणि अमानवी चेहरा उघडकीस आला आहे. २२ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास चिखली पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत दोन आयशर वाहनांत कत्तलीसाठी निर्दयपणे कोंबून नेण्यात येत असलेले तब्बल ५६ गोवंश बैल वाचवण्यात आले असून ओम मदनराजे गायकवाड यांच्या फिर्यादी वरून ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

आरोपींनी कोणताही परवाना नसताना दोरीने एकमेकांना घट्ट बांधून, दाटीवाटीने एकमेकांच्या अंगावर दाबून, चारापाणी न देता बैलांची क्रूर व अमानवी वाहतूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. हे बैल थेट कत्तलीसाठी नेले जात असल्याची प्राथमिक माहिती असून या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात दोन आयशर वाहने (किंमत अंदाजे २० लाख रुपये) तसेच ५६ बैल (किंमत सुमारे ११.४० लाख रुपये) असा एकूण ३१.४० लाख रुपयांचा मुद्देमाल आहे. आरोपींविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे, पोलीस उपनिरीक्षक शरद भागवतकर यांच्यासह संपूर्ण पथकाने दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!