बुलढाणा (हॅलो बुलडाणा) भारतीय जनता पक्षाने बिहारचे मंत्री व आमदार नितिन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.कायस्थ समाजातील नेत्याकडे पक्षाची धुरा देणे हा भाजपाचा महत्त्वाचा राजकीय डाव मानला जात आहे.
कायस्थ समाजाची लोकसंख्या देशभरात साधारणतः १.५ ते २ कोटी (सुमारे १ ते १.५ टक्के) इतकी असली, तरी उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांत या समाजाचा राजकीय, प्रशासकीय व बौद्धिक प्रभाव मोठा आहे. शिक्षण, प्रशासन आणि संघटन कौशल्यामुळे कायस्थ समाजाने कायमच निर्णायक भूमिका बजावली आहे.
इतिहासात पाहिल्यास, मुगल व ब्रिटिश काळात कायस्थांना लेखक, मुंशी, लिपिक, महसूल व्यवस्थापन अशी जबाबदारी मिळाली. १०-११व्या शतकापासून त्यांच्या अस्तित्वाचा उल्लेख आढळतो. उच्च शिक्षण व प्रशासनातील पकड यामुळे स्वातंत्र्य चळवळीतही या समाजाचा ठसा उमटला.
देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री हे कायस्थ समाजातूनच होते. साहित्य क्षेत्रात मुंशी प्रेमचंद, हरिवंशराय बच्चन, तर विज्ञानात जगदीशचंद्र बोस, सत्येंद्रनाथ बोस, शांती स्वरूप भटनागर यांनी भारताचा गौरव वाढवला. स्वातंत्र्यलढ्यात सुभाषचंद्र बोस, चित्तरंजन दास, रासबिहारी बोस, खुदीराम बोस, गणेश शंकर विद्यार्थी यांचे योगदान अविस्मरणीय आहे.
नितिन नबीन यांच्या नियुक्तीमुळे भाजपाला शहरी, मध्यमवर्गीय व बौद्धिक मतदारांमध्ये नवे बळ मिळेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. कमी लोकसंख्या असूनही व्यापक प्रभाव असलेल्या कायस्थ समाजाकडे नेतृत्व सोपवून भाजपाने आगामी राजकीय समीकरणांसाठी महत्त्वाचा संदेश दिला आहे.










