बुलढाणा (हॅलो बुलडाणा) राज्यात ‘लाडकी बहीण’ योजनेच्या घोषणा गाजत असताना जिल्ह्यात मात्र एका विवाहित महिलेला भीषण मानसिक छळ सहन करावा लागत आहे. साखरखेर्डा पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या पीडित महिलेने पती उमेश रमेश खरडे यांच्याविरोधात गंभीर आरोपांसह लेखी फिर्याद दाखल केली आहे. मात्र इतक्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारीनंतरही साखरखेर्डा पोलिसांनी केवळ एन.सी. दाखल करून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
फिर्यादीनुसार, पती उमेश खरडे हे शासकीय पदाचा गैरवापर करत पत्नीच्या बहिणीस संदेश, धमक्या देत असून छळ करत आहेत. इतकेच नव्हे तर कॉल, सोशल मीडियावरील स्टेटसद्वारे संपूर्ण कुटुंबाची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पिडीतेच्या लहान भावाला फोटो-व्हिडीओ पाठवून मानसिक त्रास दिल्याचेही गंभीर आरोप आहेत. मोबाईल हॅकिंगसारख्या गंभीर गुन्ह्याचाही उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.वेळोवेळी पीडिताने तक्रार करूनही तिला न्याय मिळाला नाही
अशा स्वरूपाचे आरोप हे साधे नसून महिलावरील अत्याचार, सायबर गुन्हे आणि मानसिक छळाच्या गंभीर श्रेणीत येतात. तरीही साखरखेर्डा पोलीस ठोस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ का करत आहेत? आरोपी शासकीय सेवेत असल्यामुळे ‘हात आखडता’ घेतला जातोय का, अशी शंका आता जनतेतून व्यक्त होत आहे.
महिलेला न्याय मिळवून देणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. मग एका महिलेला एवढा त्रास सहन करावा लागत असताना यंत्रणा गप्प का आहे? जिल्हा पोलीस अधीक्षक तांबे साहेब या प्रकरणात लक्ष घालून या ‘लाडक्या बहिणीला’ न्याय मिळवून देणार का, हाच प्रश्न जिल्ह्यातील जनतेला पडला आहे.
हॅलो बुलडाणा या प्रकरणावर लक्ष ठेवून असून, न्याय मिळेपर्यंत आवाज उठवत राहील.










