बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्हा सामान्य रुग्णालयातील अपघात विभागात दाखल करण्यात आलेल्या एका अनोळखी वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. महिला दिव्या फाउंडेशन, बुलढाणा यांच्याकडून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आली होती. मात्र डॉक्टरांनी तपासाअंती तिला मृत घोषित केले. या प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये मर्ग क्रमांक ०२/२०२६ नोंदवण्यात आला असून पोलिसांनी आता थेट नातेवाईकांचा शोध सुरू केला आहे.
मृत महिलेचे वय अंदाजे ६५ ते ६८ वर्षे असून तिची उंची सुमारे १६० सेंटीमीटर, बांधा सडपातळ, रंग सावळा आहे. डोक्यावरील केस पूर्णतः पांढरे असून कपाळाच्या मध्यभागी टिकली गोंदलेली आहे. मृत्यूवेळी तिच्या अंगात लाल व पांढऱ्या रंगाचा गाऊन होता. मात्र इतकी स्पष्ट ओळख असतानाही ही महिला कोण, कुठून आली आणि तिचे नातेवाईक कुठे आहेत, याचा अद्याप उलगडा झालेला नाही.
महत्त्वाचे म्हणजे, वृद्ध महिलेला कोणत्या परिस्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिला अपघात झाला होता की इतर काही प्रकार घडला होता, याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले असून या वर्णनाशी जुळणारी कोणतीही माहिती असल्यास तात्काळ बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.











Total Users : 3292433