बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाने सरकारी वाहन वापरावर कटाक्ष ठेवत नवा शिस्तबद्ध पायंडा राबविला आहे. अनेक अधिकारी फक्त मिरवण्यासाठी सरकारी वाहनांचा वापर करत असताना, विद्यमान जिल्हा माहिती अधिकारी स्वतः दुचाकीवर कार्यालयीन कार्यक्रमांना हजर होताना दिसत आहेत. इंधन व वाहन सुस्थितीत असूनही ते “अनावश्यक खर्च टाळणे” आणि शासन निधीचा नियमबद्ध वापर सुनिश्चित करत आहेत.
हे पाऊल प्रशासनातील साधेपणा आणि आर्थिक शिस्त याचे प्रतीक मानले जात आहे. शासनाकडून मिळणाऱ्या प्रत्येक रुपयाचे पालन आणि भविष्याच्या लेखापरीक्षणातील आक्षेप टाळण्याची दृष्टी यात दिसून येते. क्लास-१ अधिकारी असूनही सरकारी वाहनाचा मर्यादित वापर करून कामकाज चालू ठेवणे, ही बदलत्या प्रशासकीय संस्कृतीची स्पष्ट झलक आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मोठ्या भौगोलिक विस्ताराच्या बाबतीतही डिजिटल माध्यमे, व्हर्च्युअल संवाद आणि स्थानिक प्रतिनिधींमार्फत कामकाज सुरळीत चालू असल्याने वाहन मर्यादित वापरामुळे काम ठप्प होत नाही, असे प्रशासनाचे मत आहे. गतिमान प्रशासनाचा नारा जरी असला, तरी आर्थिक शिस्त राखणे आणि खर्च काटकसरीने करण्याची भूमिका अन्य अधिकाऱ्यांसाठी संदेश ठरत आहे.












