खामगाव (हॅलो बुलढाणा) तरुणाईच्या भविष्याला पोखरणाऱ्या व्यसनाविरोधात जनजागृती करत तेज मल्टीपर्पज फाउंडेशनने आठवा वर्धापनदिन साजरा केला. ५ ऑक्टोबर रोजी खामगावच्या नॅशनल हायस्कूलमध्ये व्यसनमुक्ती जनजागृती सत्र आणि ‘नो ड्रग्स’ अभियान उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांना व्यसनाचे गंभीर दुष्परिणाम समजावून सांगत निरोगी आयुष्याचा संदेश देण्यात आला.
‘ड्रग्सला ठाम नकार द्या आणि उज्ज्वल भविष्य घडवा,’ असे आवाहन प्रमुख मार्गदर्शक डॉ. सुरेखा मेंढे यांनी केले. व्यसनाच्या विळख्यात अडकण्याऐवजी शिक्षण, आरोग्य आणि भविष्याला प्राधान्य देण्याचा विचार या सत्रातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला. वर्धापनदिनाच्या निमित्ताने राबवलेला हा उपक्रम तरुणाईला व्यसनापासून दूर ठेवण्याच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारा ठरला.
समाजसेवी व उद्योजक तेजस प्रकाशचंद झांबड यांच्या पुढाकाराने २०१८ मध्ये संस्थेची स्थापना झाली. ‘मानवतेसाठी कार्य’ या ब्रीदवाक्याने सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, पर्यावरण आणि आरोग्य या पाच क्षेत्रांत संस्था सातत्याने निःशुल्क सेवाकार्य राबवत आहे. विविध सेवा प्रकल्पांच्या माध्यमातून गरजूंपर्यंत मदत पोहोचवण्याचे काम सुरू आहे.
कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष तेजस प्रकाशचंद झांबड, लायन्स क्लब खामगाव संस्कृतीचे अध्यक्ष लायन नरेश चोपडा, लायन्स क्लब खामगावचे अध्यक्ष लायन पिनेश कामानी आणि लायन सागर गुजर यांची प्रमुख उपस्थिती होती.
व्यसनाला थारा देऊ नका; स्वतःच्या भविष्याची राख होऊ देऊ नका! हाच ठळक संदेश या अभियानातून देण्यात आला. वर्धापनदिनाला समाजप्रबोधनाची जोड देत तेज फाउंडेशनने नशामुक्त जीवनाचा विचार विद्यार्थ्यांसमोर ठेवला.




Total Users : 3564797