धाड (हॅलो बुलडाणा) परिसरात दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण भयावह वेगाने वाढत असून आज पुन्हा एकदा मृत्यूने रक्तरंजित थैमान घातले. करडी (धाड) येथील पुलावर आज सोमवार, ५ जानेवारी रोजी सायंकाळी ४.५० वाजता झालेल्या भीषण अपघातात ट्रिपल सीट दुचाकीस्वार तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगरकडून धाडकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसखाली दुचाकी अक्षरशः चिरडली गेली.
मलकापूर आगाराची एसटी बस (क्रमांक एमएच-06-बीडब्ल्यू-3638) ही आज छत्रपती संभाजीनगर येथून मलकापूरकडे जात होती. त्याचवेळी ढाल सावंगी (ता. बुलढाणा) येथील अंकुश पाडळे, रवी चंदनशे आणि कैलास शिंदे हे तिघे एका मोटारसायकलवर ट्रिपल सीट प्रवास करत धाडवरून करडीच्या दिशेने जात होते. करडी पुलावर येताच समोरासमोर जोरदार धडक होऊन दुचाकी बसखाली घुसली आणि काही क्षणांतच तिघांचे प्राण गेले.
अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा अक्षरशः चुरा झाला. यातील एकाच्या डोक्याची कवटी फुटून मेंदू रस्त्यावर सांडल्याचे हृदयद्रावक दृश्य पाहून घटनास्थळी उपस्थित नागरिक हादरून गेले. रक्ताने माखलेला पूल आणि विखुरलेले अवयव पाहून परिसरात भीतीचे वातावरण पसरले.या अपघातानंतर करडी पुलावर काही काळ वाहतूक ठप्प झाली. नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. ढाल सावंगी गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.












