spot_img
spot_img

‘कोण आधी पोहोचतो’ शर्यतीत प्राण गमावला! ट्रॅक्टर पलटी होऊन मृत्यू

डोणगाव (हॅलो बुलडाणा/अनिल राठोड)
डोणगावपासून जवळ असलेल्या आरेगाव माळ परिसरात बेकायदेशीर मुरूम वाहतुकीचा भीषण परिणाम समोर आला असून, ट्रॅक्टर पलटी होऊन १७ वर्षांच्या अल्पवयीन चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवार, २ जानेवारी रोजी रात्री सुमारे एक वाजता घडली.

एम.एच. २८ टी ८७०९ या ट्रॅक्टरवर ऋषिकेश किरण भुतेकर (वय १७ वर्षे ७ महिने) हा अल्पवयीन मुलगा भरधाव वेगात ट्रॅक्टर चालवत असताना नियंत्रण सुटले. ट्रॅक्टर रस्त्याखालील नालीत जाऊन पलटी झाला आणि त्याखाली दबून ऋषिकेश गंभीर जखमी झाला. उपचारासाठी संभाजीनगरकडे नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.

धक्कादायक बाब म्हणजे, वाहन चालवण्यास अपात्र असलेल्या अल्पवयीन मुलाच्या हाती ट्रॅक्टर देण्यात आला. कमी पैशात काम करून घेण्यासाठी कायद्याला हरताळ फासण्यात आल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी मृत मुलाचे वडील दत्ता पुंजाजी भुतेकर यांच्या फिर्यादीवरून डोणगाव पोलिसांनी ट्रॅक्टर मालक पवन अरुण काळे (रा. डोणगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, आरेगाव रस्त्यावरील एका बांधकामासाठी रात्री उशिरापर्यंत मुरूम वाहतूक सुरू होती. काही चालकांमध्ये कोण आधी पोहोचतो याची शर्यत सुरू होती. प्रशासन आणि पोलिसांचे दुर्लक्ष, अवैध कामे आणि पैशांच्या हव्यासाने एका निष्पाप जीवाचा बळी घेतला, असा संताप व्यक्त होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!