शेगाव (हॅलो बुलडाणा) घरगुती हिंसाचाराच्या घटनांनी समाज सुन्न होत असतानाच शेगावातुन एक संतापजनक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. लग्नानंतर काही वर्षे सुरळीत संसार झाल्यानंतर पतीच्या दारूच्या व्यसनाने विवाहितेचे आयुष्य नरक बनल्याचा आरोप करण्यात आला आहे. नित्याची शिवीगाळ, मारहाण, मानसिक छळ यामुळे पीडितेला माहेरी राहण्याची वेळ आली होती.
घटनेच्या दिवशी पती दारू पिऊन घरी आल्यावर विनाकारण मारहाण केल्याचे सांगण्यात येते. आवाज ऐकून घरातील इतर सदस्य घटनास्थळी आले. मात्र मध्यस्थी करण्याऐवजी पीडितेलाच दोषी ठरवून सामूहिक छळ करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. हात-पाय पकडून जबरदस्तीने उंदीर मारण्याचे औषध पाण्यात मिसळून तिच्या तोंडात ओतल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. इतकेच नव्हे तर नंतर घराबाहेरून दरवाजा बंद करून तिला मरणाच्या दाढेत ढकलण्यात आले.
विषबाधेमुळे पीडितेची प्रकृती खालावली. उलट्या, अशक्तपणा, गळ्याला तीव्र वेदना सुरू झाल्या. सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात, नंतर जिल्हा रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. गळ्यात गंभीर संसर्ग होऊन शस्त्रक्रिया करावी लागल्याची माहिती आहे. तब्बेत अत्यंत नाजूक असल्याने तत्काळ तक्रार देता आली नाही, मात्र उपचारानंतर अखेर पोलिस ठाण्यात धाव घेण्यात आली. विवाहितेच्या जबाबावरून पोलिसांनी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.












