चिखली (हॅलो बुलडाणा)पत्रकारितेतील निर्भीडपणा, सत्यनिष्ठा आणि समाजहितासाठी झुंज देणाऱ्या पत्रकारांचा गौरव करत चिखली तालुका पत्रकार संघाने यंदाचे जीवन गौरव, शोध पत्रकारिता आणि नवपत्रकारिता पुरस्कार जाहीर करून पत्रकारितेच्या मैदानात नवा उत्साह निर्माण केला आहे. येत्या ६ जानेवारी २०२६ रोजी दर्पण दिनानिमित्त हे पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.
यंदाचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार तथा साप्ताहिक ‘चिखली अंजली’चे मुख्य संपादक रमाकांत गयाप्रसाद कपूर यांना जाहीर झाला आहे. तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी निष्पक्ष, निर्भीड पत्रकारितेची मशाल पेटती ठेवली.
शोध पत्रकारिता पुरस्कार देऊळगाव मही (ता. देऊळगाव राजा) येथील अनुभवी पत्रकार सुनील सुदाम मतकर यांना जाहीर झाला असून, बोगस अपंग प्रमाणपत्रासह अनेक गंभीर प्रकरणांचा पर्दाफाश करून त्यांनी व्यवस्थेला हादरवले.
विशेष लक्ष वेधून घेणारा पुरस्कार ठरला आहे “स्व. गिरीश दुबे नवपत्रकारिता पुरस्कार”, जो चिखलीतील युवा पत्रकार सैय्यद साहिल सैय्यद राजू यांना जाहीर झाला आहे. ‘हॅलो बुलढाणा’ या लोकप्रिय ई-चॅनलचा आक्रमक, वेगवान आणि विश्वासार्ह शिलेदार म्हणून साहिलने अल्पावधीत जिल्हाभरात ठसा उमटविला आहे. प्रतिकूल परिस्थितीतून उभारी घेत पत्रकारितेत स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या साहिलच्या या यशामुळे हॅलो बुलढाणा परिवारासह संपूर्ण चिखलीत अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.












