spot_img
spot_img

शेतात जीवाचं रान केलं… पण मातीतच झाला शेवट! कर्ज, नापिकी आणि अतिवृष्टीने जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांचे प्राण गेले

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) सततची नापिकी, वाढतं कर्ज आणि शासनाच्या पोकळ आश्वासनांमुळे शेतकरी आत्महत्या सत्राने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी दोन कर्त्या शेतकऱ्यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. शेतकऱ्यांच्या वेदनांकडे डोळेझाक करणारी यंत्रणा आणि कोसळलेली शेती व्यवस्था पुन्हा एकदा उघडी पडली आहे.

मेहकर तालुक्यातील अंत्री खेडेकर येथे 29 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास 60 वर्षीय शेतकरी रतन लक्ष्मण चांदले यांनी स्वतःच्या शेतात बाभळीच्या झाडाला गळफास घेतला. कोरडवाहू शेती, पीक कर्ज, पत्नीच्या नावावर घेतलेलं अतिरिक्त कर्ज आणि यावर्षी झालेली पूर्ण नापिकी… या सगळ्याच्या विळख्यात अडकलेले रतन चांदले नैराश्यात होते. शेतात जातो असं सांगून ते घरातून निघाले आणि परत कधीच आले नाहीत. पतीचा मृतदेह पाहून पत्नीने दिलेला आक्रोश आजही शिवारात घुमत आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडलं आहे.

त्याच दिवशी मलकापूर तालुक्यातील मलकापूर पांगरा शिवारात आणखी एक धक्कादायक घटना घडली. 61 वर्षीय शेतकरी बाबुराव श्रीराम देशमुख यांनी उंबराच्या झाडाला गळफास घेतला. अतिवृष्टीने पीक हातातून गेलं, बँक आणि खाजगी कर्जाचा डोंगर वाढला आणि मानसिक तणावाने त्यांनी मृत्यूचा मार्ग स्वीकारला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!