बुलढाणा (हॅलो बुलडाणा) भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अर्पिताताई विजयराज शिंदे यांच्या प्रचारासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बुलढाण्यात आले असता, मंचावर एका क्षणी वातावरण तापले. कारण बहुजन भीम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी नगरसेवक दादाराव गायकवाड यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर अक्षरशः तोफ डागली.
दादाराव गायकवाड म्हणाले, ‘धर्मवीर’ची पदवी लावून फिरणारे हे महाशय! धर्मवीर होण्यासाठी लायकी लागते. पाच-दहा हजाराची मदत करून गावभर दिंडोरा पिटणं हा धर्मवीरांचा स्वभाव नसतो.”ते पुढे म्हणाले की शहरातील सर्व पुतळे हे संबंधित समाजांनी लोकवर्गणी करून उभारले असून, आमदार संजय गायकवाड फुकटाचे श्रेय घेत आहेत. “एका पुण्याच्या कॉन्ट्रॅक्टरला फोन करून १६ लाखांचा पुतळा असल्याचे सांगायला सांगितले आणि स्वतः ल दोन लाख दिल्याचे समितीला सांगावे, अशी आमदारांची सेटिंग होती,”असा धक्कादायक आरोप त्यांनी केला.
तिकीट वाटपावरूनही त्यांनी आमदारांना लक्ष्य केले. “सर्व्हे करतो म्हणणाऱ्या आमदारांनी तिकीट फक्त जवळच्यांनाच दिली. जवळच्या तीन-चार जणांना तिकीट देऊन कार्यकर्त्यांची फसवणूक केली,”असा आरोप गायकवाडांनी केला.ते इथेच थांबले नाहीत. “शहरातील एकाच रस्त्याचे दीड-दोन वर्षांत तीनदा काम झाले. एका वेळेला ७० लाखांचा खर्च! किती पैसा खाल्ला असेल याचा अंदाज जनतेने लावावा,” असा थेट भ्रष्टाचाराचा आरोप त्यांनी सभेतच केला.
आमदारांनी स्वतच्या मुलासाठी मंत्रालयात आरक्षणाची ‘सेटिंग’ लावल्याचेही त्यांनी सांगितले. “दोन वर्ष मुलाला गरगर फिरवूनही काही झाले नाही. शेवटी बुलढाण्याची जागा महिला राखीव सुटली,”असा खोचक आरोप त्यांनी केला.माजी नगरसेवक दादाराव गायकवाड यांच्या या आक्रमक भाषणाने संपूर्ण सभा क्षणभर भारावून गेली. बुलढाणा राजकारणात या आरोपांनी मोठी खळबळ उडण्याची चिन्हे आहेत.














