चिखली (हॅलो बुलडाणा) नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्राचार्य डॉ. निलेश गावंडे यांच्या समर्थनार्थ गुरुवारी चिंच परिसरात आयोजित जाहीर सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सभेला अणुशक्ती नगरच्या आमदार सना मलिक शेख आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री माणिकराव कोकाटे हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाला विशेष वजन प्राप्त झाले.
नागरिक, महिला, युवक आणि सर्व समाजघटकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून सभेची शोभा वाढवली. विशेष म्हणजे मुस्लिम समाज, मल्हार सेना–धनगर समाज, मराठा, ओबीसी, बहुजन आणि विविध समाजबांधवांची उपस्थिती लक्षणीय होती.
सभेत बोलताना आमदार सना मलिक शेख यांनी अल्पसंख्याक, कुरेशी समाज आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर थेट भाष्य केले. त्यांनी सांगितले की, मुस्लिम कुरेशी समाज राष्ट्रवादीसोबत ठामपणे उभा असून कारवाई गाडीवर व्हावी, निरपराध जनावरांच्या मालकांवर अन्याय होऊ नये. रोजगार, शिक्षण आणि महिला सक्षमीकरणासाठी त्या कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. “जमीर जिंदा रखो… पैसे मिळाले तरी मतदानाचा अधिकार विकू नका” असे आवाहन करत त्यांनी नागरिकांना प्रामाणिकपणे मतदान करण्याची प्रेरणा दिली. “गावंडे सरांना विजयी करा… सत्ता आपली आहे, विकासात कोणतीही कमतरता पडू देणार नाही,” असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
यानंतर मंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्राचार्य गावंडे यांच्या उमेदवारीला ठाम पाठिंबा देत म्हटले की, “तुम्ही डॉ. निलेश गावंडे यांना जिंका द्या… विकास आम्ही करून देऊ याची संपूर्ण हमी देतो.” पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, कचरा व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांसाठी तातडीने निधी देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. अल्पसंख्याक समाजाच्या योजनांची योग्य अंमलबजावणी केली जाईल आणि राज्य सरकार चिखलीच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.














