बुलडाणा (हॅलो बुलडाणा) नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर आज राजकीय वातावरण अक्षरशः तापले, कारण राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांनी बुलडाणा शहरात येत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व रिपाइ (आठवले गट) या मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या प्रचाराला शक्तिशाली चालना दिली. विजयराज शिंदे यांच्या निवासस्थानी झालेल्या या अत्यंत महत्वपूर्ण बैठकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. अर्पिताताई विजयराज शिंदे यांना मोठे राजकीय बळ मिळाले.
बैठकीत अजितदादांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट शब्दांत आदेश दिला.युतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय मिळवून द्या! बुलडाण्याच्या विकासासाठी निधीची कमतरता कधीही भासू देणार नाही. त्यांच्या या ठाम घोषणेने उपस्थितांमध्ये नवा जोश, नवी उर्जा संचारली. विकासाभिमुख दृष्टीकोन, प्रामाणिकपणा आणि संघटनात्मक बळाचा संदेश देत दादांनी प्रचार धोरण, बूथ व्यवस्थापन, कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्या यावर सविस्तर चर्चा केली.अजितदादांच्या उपस्थितीने संपूर्ण सभागृहात विजयी आत्मविश्वास उसळला. युतीच्या कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती पाहता, नगरपरिषदेतील विजयाचा मार्ग अधिक भक्कम झाल्याचे संकेत स्पष्टपणे दिसून आले.
या बैठकीत आमदार अमोलजी मिटकरी, आमदार श्वेताताई महाले पाटील, बुलडाणा अर्बन परिवाराचे सर्वेसर्वा राधेश्यामजी चांडक, भाजपा ज्येष्ठ नेते गोकुळजी शर्मा, जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, प्रदेशाध्यक्ष नाझर काझी, जेष्ठ विधीज्ञ एड. व्ही.डी. पाटील, IMA माजी अध्यक्ष डॉ. अजित शिरसाठ आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.














