मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्राच्या राजकारणात महायुती एकसंघ असल्याचा देखावा अखेर कोसळला आहे! स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या रणधुमाळीत भाजपात जोरदार इनकमिंग सुरू असून, या इनकमिंगचा सर्वात मोठा फटका शिवसेना शिंदे गटाला बसल्याने संतापाचा महापूर उसळला आहे. महायुतीत सर्व काही ठीक असल्याचे दाखवले जात असले, तरी प्रत्यक्षात शिंदे गटात प्रचंड असंतोष उसळलेला आहे. भाजपामुळे जागा आणि कार्यकर्त्यांच्या नाराजीनं शिंदे गट पेटून उठला आहे. मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, नाराजीची खुलेआम अभिव्यक्ती आणि त्यानंतर दिल्ली दौरा या सगळ्यांमुळे वातावरण अधिकच तापले आहे.
डहाणू नगर परिषद प्रचारसभेत एकनाथ शिंदे यांनी पहिल्याच वेळी भाजपावर नाव न घेता कडाडत घणाघात केला! “एवढे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले तर समोरच्यांचे डिपॉझिट उरणार नाही! परिवर्तनाचा भगवा डहाणूत फडकणार!” अशा शब्दांत त्यांनी रणशिंग फुंकलं. “लाडक्या बहिणी सत्ता उलटवतात, समुद्राइतकी मोठी मनं आमच्या पाठीशी उभी आहेत!” अशा खोचक भाषेत शिंदे यांनी संदेश दिला. या सभेतील जनसमुदाय पाहून विजय निश्चित असल्याचा दावा करत त्यांनी ‘शिक्का’वर मतांचा पाऊस पाडण्याचे आवाहन केले.
परंतु इथं राजकीय नाट्य अधिक रंगतं शिंदे यांनी केलेल्या “एकाधिकारशाही आणि अहंकाराविरोधात एकत्र आलो आहोत” या टिप्पणीला भाजपावर थेट हल्ला मानलं जात असतानाच उपमुख्यमंत्री कार्यालयाने तातडीने स्पष्टीकरण देत नुकसाननियंत्रण सुरू केलं. हा टोला भाजपाला नव्हे तर उद्धव ठाकरे यांना असल्याचा दावा करण्यात आला!
मात्र महायुतीतले तडे आता उघड उघड दिसू लागले आहेत. भाजपचे वाढते इनकमिंग, मित्रपक्षांचा रोष, जागावाटपातील संघर्ष, आणि शिंदे यांचा उफाळलेला सूर—या सर्वांनी महाराष्ट्राच्या राजकारणात धूमसणारे वादळ निर्माण केले आहे!












