बेलाड (हॅलो बुलढाणा) मलकापूर तालुक्यातील बेलाड येथे आज क्रांतिकारी शेतकरी संघटना द्वारा आयोजित एल्गार सभेत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर जोरदार हल्ला चढवत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी तीव्र लढ्याचा इशारा दिला. “शेतकऱ्यांच्या खिशात पैसा आला की बाजारात पैसा येतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढणे हे पुण्याचं काम आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी, कितीही संकटं आली तरी आम्ही लढत राहू,” असे तुपकर म्हणाले. ते पुढे म्हणाले, “शेतकऱ्यांवर झालेलं कर्ज हे सरकारच्या चुकीच्या धोरणांचं फळ आहे. मी आमदार, खासदार नाही झालो तरी चालेल, पण शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच माझं सर्वोच्च प्राधान्य आहे.”
तुपकर यांनी शेतकऱ्यांना एकजुटीचं आवाहन करताना म्हटलं, “शेतकऱ्यांनो, तुमच्या अंगावर कोणतंही संकट आलं तरी एकजूट ठेवा. एकजुटीची ताकद मोठी असते. पंजाबच्या शेतकऱ्यांप्रमाणे प्रदीर्घ लढ्याची तयारी ठेवा. जातीसाठी जसं लढता, तसं आता मातीसाठी लढा.” सरकारवर टीका करताना ते म्हणाले, “सोयाबीन आणि कापसाचे भाव देणे ही सरकारची जबाबदारी आहे. सोयाबीनचे भाव सोयापेंड निर्यातीवर अवलंबून आहेत, म्हणून निर्यातीला प्रोत्साहन दिलं पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी जसे संघटित आहेत, तसे विदर्भातील शेतकरीही संघटीत झाले पाहिजेत.”
शेतकरी वर्गातील वाढत्या असंतोषाचा उल्लेख करताना त्यांनी इशारा दिला की, “शेतकऱ्यांची पोरांची आज लग्न होत नाहीत, शेतकरी संकटात आहेत. उद्या त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि मंत्र्यांच्या गाड्या फोडल्या, तर त्यात नवल वाटू नये.” “देशाचं स्वातंत्र्य आंदोलनातून मिळालं, तसेच शेतकरी प्रश्नही आंदोलनातूनच सुटणार आहेत. मत मागणाऱ्या उमेदवारांना विचारलं पाहिजे – तुम्ही किती वेळा शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं?” असा प्रश्न तुपकर यांनी उपस्थित केला. “मागील वर्षी शेतकऱ्यांसाठी लाठीचार्ज झाला तरी आम्ही मागे हटलो नाही. शेतकऱ्यांचा हक्काचा पिकविमा घेतलाच,” असं सांगत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील आपल्या वचनबद्धतेची पुनरुज्जीवित घोषणा केली. या एल्गार सभेला परिसरातील शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती लाभली होती . कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी अमोल राऊत सचिन शिंगोटे यांसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पार पाडली














