बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरातील मोबाईल चोरांच्या साखळीचा पर्दाफाश करत शहर पोलिसांनी जबरदस्त धडक कारवाई केली आहे. तब्बल २२ मोबाईल फोन मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले असून, ३ लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेचं ठोस उदाहरण ठरली आहे या यशस्वी मोहिमेमुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास वाढला असून गुन्हेगारांचं धाबं दणाणलं आहे. विशेष म्हणजे हे मोबाईल अकोला, जळगाव, जालना या परजिल्ह्यांमध्ये मिळाले, आणि काही अनोळखी व्यक्तींनी ते मोबाईल खरेदी केल्याचंही निष्पन्न झालं आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, ठाणेदार रवि राठोड यांच्या नेतृत्वात पोउनि रवी मोरे, हेड कॉन्स्टेबल संदीप कायंदे, युवराज शिंदे, विनोद बोरे,मनोज सोनूने, कौतुक बोर्डे, विशाल बनकर यांच्या विशेष पथकाने सीडीआर, तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे ही मोठी कामगिरी पार पाडली.
परंतु या घडामोडींमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे कारंजा चौकातील शिव कॉम्प्लेक्समध्ये दरोड्याच्या उद्देशाने आलेले गुन्हेगार अजूनही का मोकाट? या प्रकरणाचा तपास लावण्याची मागणी आता जनतेकडून जोर धरू लागली आहे. मोबाईल चोर पकडले, आता दरोडेखोरही गजाआड गेलेच पाहिजेत, अशी बुलढाणेकरांची ठाम भावना आहे












Total Users : 3427578