रायपूर (हॅलो बुलडाणा/सचिन जयस्वाल) छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत दिनांक ११ जून रोजी रायपूर येथे आयोजित ‘महाराजस्व समाधान शिबीर’ हा जणू शासकीय सेवांचा महासागर ठरला! तलाठी कार्यालयाजवळील जि. प. शाळेच्या प्रांगणात भरवलेल्या या भव्य शिबिरात शेकडो नागरिकांनी विविध शासकीय सेवांचा लाभ घेतला.‘एकाच ठिकाणी सर्व सेवा’ या ध्येयाने प्रेरित शिबिरात आधार-रेशन कार्ड दुरुस्ती, उत्पन्न-जात-डोमिसाईल प्रमाणपत्रे, किसान योजना, पथदर्शी आरोग्य तपासणी, माती परीक्षण, आयुष्मान खाते, शेततळे अर्ज, आणि इतर महत्त्वाच्या योजना एकाच छाताखाली नागरिकांना उपलब्ध करून दिल्या गेल्या.
या वेळी उपविभागीय अधिकारी शरद पाटील, तहसीलदार विठ्ठल कुमरे, नायब तहसीलदार अनंता पाटील, विविध विभागांचे अधिकारी व सरपंच सौ. सीमा देशमाने यांनी उपस्थित राहून शिबिराचे नेतृत्व केले. श्री. पाटील यांनी नागरिकांना सल्ला दिला की, अशा शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घ्या, प्रशासन तुमच्यासाठी तयार आहे!