देऊळगाव राजा (हॅलो बुलडाणा/ संतोष जाधव) समृद्धी महामार्गावर दुसरबीडजवळ आज पहाटे 3.15 वाजता एक थरकाप उडवणारा अपघात टळला. नागपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या पूजा ट्रॅव्हल्स (चालक: विनोद पखाले, वय 40, रा. वर्धा) ने समोरील ट्रेलर (PB-06-V-5180) ला जोरदार धडक दिली. ट्रेलरवर लोखंडी सळया असल्याने ट्रॅव्हल्सच्या डाव्या बाजूस भीषण नुकसान झाले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली!अपघातात कल्पना रमेश नासरे (30, नागपूर) या महिला प्रवाशाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना 108 समृद्धी ॲम्बुलन्सने तातडीने जालना येथे हलवले. अथर्व देशमुख (24, वर्धा) आणि विक्की चव्हाण (30, शिवनी, म.प्र.) हे किरकोळ जखमी झाले. डॉक्टर स्वप्निल सुसर आणि चालक पडघान यांनी जागेवर प्रथमोपचार केले.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, बीबी पोलीस स्टेशनचे अधिकारी, महाराष्ट्र सुरक्षा बल, तसेच QRV टीम घटनास्थळी दाखल झाली. अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स आणि ट्रेलर बाजूला करून महामार्ग मोकळा करण्यात आला. ट्रॅव्हल्समध्ये एकूण 33 प्रवासी होते. अपघातातील बचावामुळे ‘दैव बलवत्तर’ असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.या अपघाताची नोंद बीबी पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे.