डोणगाव (हॅलो बुलडाणा/अनिल राठोड) आधुनिकतेच्या वावटळीत हरवलेल्या मराठमोळ्या परंपरांना डोणगावात नवसंजीवनी मिळाली! प्रतिष्ठित व्यापारी गणेशराव आप्पाजी गोळे यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याने संपूर्ण गावच नव्हे, तर सोशल मीडियावरही खळबळ उडवली आहे. यावेळी बैलगाडीतून निघालेली वरात, पळसाच्या पानांनी सजवलेला मांडव, आणि पारंपरिक वेशभूषेत सजलेली वऱ्हाडी मंडळींनी उपस्थितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आणले.वधू शुभांगी आणि वर योगेश यांच्या विवाहाची सुरुवात बैलगाडीतून निघालेल्या ढोल-ताशांच्या गजरात झाली. गावातील मुख्य रस्त्यांवरून गेल्यानंतर प्रत्येक जण थबकून हा दृश्यावलोकन करत होता. बैलांना आकर्षक पोशाख, हार, आणि बिल्ल्यांनी सजवण्यात आले होते. वऱ्हाड्यांनी पितांबर, फेटे, सोनेरी गोट्यांनी परिधान करून पुरेपूर मराठमोळा अंदाज खुलवला.
हिरव्या पळसाच्या पानांनी मांडव सजवण्यात आला होता. द्रोण, पात्रवाळी आणि पारंपरिक खाद्यपदार्थांनी पाहुण्यांचे स्वागत झाले. वधूने ‘मळवट’, टिकल्या, आणि पारंपरिक दागिने घालून प्रत्येक बारीकसारीक गोष्टींमध्ये परंपरेचा सन्मान राखला.या विवाहाने सोशल मीडियावरही जोरदार चर्चा पेटली असून ‘बैलगाडीवरून वरात’ ही संकल्पना अनेकांना भुरळ घालत आहे. गावकरी, पाहुणे आणि नेटकर्यांनी या पारंपरिक उपक्रमाचे भरभरून कौतुक केले आहे