spot_img
spot_img

घरात टीव्ही पाहायला आल्या… अन् कपाटातून 2.28 लाख गायब? बुलढाण्यात भाडेकरू बहिणींवर चोरीचा संशय; डिजिटल घड्याळाने उघड केला ‘सस्पेन्स’!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरात घरातून 2 लाख 28 हजार रुपये गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. राजेश्वर नगर परिसरातील निर्मिती अपार्टमेंटजवळ राहणाऱ्या एका महिलेच्या घरातील कपाटाच्या ड्रॉवरमधून ही रक्कम चोरी झाल्याची तक्रार बुलढाणा शहर पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सौ. वनिता प्रमोद गावंडे या पती आणि मुलांसह राहत असून त्या व त्यांचे पती दोघेही खासगी नोकरी करतात. त्यामुळे दररोज सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेसहा या वेळेत दोघेही घराबाहेर असतात. त्यांच्या घराचे दोन मजले असून खालच्या मजल्यावरील खोल्या भाड्याने दिलेल्या आहेत.

फर्निचरच्या कामासाठी 28 मे रोजी नातेवाईकांनी दिलेले 1 लाख 50 हजार रुपये आणि आधीपासून घरभाड्याचे जमा असलेले 78 हजार रुपये, अशी एकूण 2 लाख 28 हजारांची रक्कम कपाटातील ड्रॉवरमध्ये ठेवण्यात आली होती. ड्रॉवरला लॉक लावले असले तरी चावी त्याच ठिकाणी ठेवलेली होती.

6 जून रोजी फर्निचर मिस्त्रीला पैसे देण्यासाठी कपाट उघडले असता रक्कम गायब असल्याचे लक्षात आले. यानंतर घरातील मुलांकडे विचारणा केली असता धक्कादायक माहिती समोर आली. 29 मे रोजी भाड्याने राहणाऱ्या दोन मुली घरात टीव्ही पाहण्यासाठी आल्या होत्या. त्यापैकी एका मुलीने मुलाला घराबाहेर नेले, तर दुसरी किचनमध्ये गेल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी कपाटाचा आवाज आल्याचेही मुलाने सांगितले.

विशेष म्हणजे, “आम्ही घरात आलो हे मावशीला सांगू नको” असे सांगून मुलाला डिजिटल घड्याळ देण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच 1 जूनपासून संबंधित मुलींनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी दोन्ही भाडेकरू बहिणींवर चोरीचा संशय व्यक्त करण्यात आला असून बुलढाणा शहर पोलिसांनी तक्रारीवरून तपास सुरू केला आहे. मात्र घरात ये-जा, कपाटाचा आवाज आणि डिजिटल घड्याळ या सगळ्या गोष्टींमुळे या चोरीभोवतीचा सस्पेन्स अधिकच वाढला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!