बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरात नवविवाहितेच्या छळाचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या प्रकरणात बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात अप. नं. 499/26 कलम 85, 351(2) BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुलढाण्यातील एका विवाहितेने पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध मानसिक व शारीरिक छळ, शिवीगाळ, धमक्या, मारहाण आणि पैशाच्या मागणीचे गंभीर आरोप केले आहेत.
तक्रारीनुसार, पीडितेचा विवाह 18 एप्रिल 2025 रोजी बुलढाणा येथील अजिंठा रोडवरील व्हाइट रोज हॉटेल बँक्वेट हॉलमध्ये हिंदू रीतीरिवाजानुसार झाला होता. लग्नावेळी साडेसात तोळे सोने, गोफ, मंगळसूत्र, सोन्याचे कडे, अंगठी, तसेच गोफासाठी दीड लाख रुपये, घरातील फर्निचरसाठी दोन लाख रुपये आणि लग्नखर्चासाठी तीन लाख रुपये दिल्याचा उल्लेख तक्रारीत आहे.
विवाहानंतर काही दिवस हतेडी येथे ठेवून नंतर पती तिला पुणे येथील बाणेर परिसरातील ज्युपिटर हॉस्पिटलमागील प्रथमेश पार्क रोडवरील फ्लॅटमध्ये घेऊन गेला. मात्र तेथे गेल्यानंतर अंगावरील दागिने काढून घेण्यात आले आणि पुण्यात फ्लॅट घेण्यासाठी माहेरून 25 लाख रुपये आणण्याची मागणी सुरू झाल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
तक्रारीनुसार, “तुझ्या वडिलांनी 25 लाख रुपये दिले नाहीत, तर तुला जिवे मारू,” अशा धमक्या देत तिला उपाशी ठेवणे, खोलीत कोंडणे, मारहाण करणे, मोबाईल तपासणे, माहेरी बोलू न देणे असे प्रकार सुरू होते. 16 जून 2026 रोजी पतीने गळा दाबण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. 27 ऑगस्ट रोजी पुन्हा बेदम मारहाण करून हातपाय बांधण्याचा प्रयत्न झाल्याचेही तक्रारीत नमूद आहे.या संपूर्ण प्रकरणाने बुलढाण्यात खळबळ उडाली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.












