सिंदखेडराजा (हॅलो बुलडाणा/सुरेश हुसे) सिंदखेडराजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीपात्रामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीवर आळा घालण्यासाठी महसूल विभागाने आज दिनांक ३१ मे रोजी निर्णायक पावले उचलली. उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलदार अजित दिवटे यांच्या नेतृत्वात, हिवरखेड पूर्णा, तढेगाव आणि दुसरबिड येथील अवैध रेती वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेले रस्ते जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आले.ही कारवाई ग्राम महसूल अधिकारी गौरख पवार, विष्णू थोरात आणि वसुदेव जायभाये यांनी यशस्वीरित्या पार पाडली. या मार्गांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर खडकपूर्णा नदीपात्रातून अवैध रेती उत्खनन केले जात होते, हे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे या रस्त्यांचे उच्चाटन करून रेती तस्करी रोखण्याचा ठोस प्रयत्न करण्यात आला आहे.
अवैध रेती उत्खननाचे हे प्रकरण गंभीर स्वरूप धारण करत असल्याने, काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी साठेगाव, निमगाव वायाळ, हिवरखेड पूर्णा आदी गावांतील नदीपात्रात भेट देत परिस्थितीची पाहणी केली होती. यानंतर महसूल विभागाने सखोल नियोजन करून रस्ते तोडण्याची मोहीम राबवली असून, कारवाईचा वेग अधिक वाढवण्यात येत आहे.महसूल प्रशासनाच्या या कठोर पावलामुळे रेती माफियांना मोठा धक्का बसला असून, अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर देखील कडक कारवाई सुरू आहे. महसूल विभागाच्या या भूमिकेचे स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींकडून स्वागत करण्यात येत आहे. भविष्यातही अशी कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.




Total Users : 3596994