मलकापूर (हॅलो बुलडाणा) फ्युचर अर्थ सोशल वेल्फेअर मल्टीपर्पज फाऊंडेशन महाराष्ट्रच्या वतीने प्रदान करण्यात येणारा राज्यभूषण पुरस्कार यंदा मलकापूरचे माजी नगराध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते नारायणदास निहलानी यांना प्रदान करण्यात आला. नागपूर येथे १० मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य समारंभात केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते निहलानी यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी खासदार अनिल बोंडे, फाऊंडेशनचे अध्यक्ष आशुतोष भोरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
नारायणदास निहलानी यांनी नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात मलकापूरच्या विकासासाठी भरीव योगदान दिले आहे. गुरूलिला निहलानी ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या २१ वर्षांपासून बस स्टँड परिसरात आणि तहसील परिसरात थंड पाण्याच्या पाणपोया चालवत गोरगरिबांना मदतीचा हात दिला आहे. याशिवाय, सेवासंकल्प आश्रमातही त्यांनी समाजसेवेचे अनोखे उदाहरण साकारले आहे. गरजू रुग्णांना आर्थिक मदत आणि सामाजिक प्रश्नांवर तत्परता दाखविणारे निहलानी हे मलकापूरच्या जनतेसाठी नेहमीच आधारवड ठरले आहेत.