बुलढाणा (हॅलो बुलडाणा) समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू असीम आझमी यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत रिटायर्ड असिस्टंट पोलीस कमिशनर डॉ. रियाज़ देशमुख यांची महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती केली आहे. डॉ. देशमुख यांच्या पोलीस सेवेमधील दीर्घ अनुभव आणि अन्यायाविरुद्ध लढण्याच्या जिद्दीमुळे पक्षाला अधिक बळकटी मिळेल, असा पक्षाचा विश्वास आहे.
औरंगाबाद येथे वास्तव्यास असलेल्या डॉ. देशमुख यांनी पोलीस सेवेनंतर सामाजिक मुद्द्यांवर काम करत समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. ‘सत्यपत्रक’ या मराठी दैनिकाद्वारे त्यांनी सामाजिक अन्यायावर आवाज उठवला आहे.
सन २०२३ मध्ये किराडपूरा येथे झालेल्या दंगलीत निष्पाप व्यक्तीचा मृत्यू झाला होता. पोलिसांच्या चुकीच्या फायरिंगमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर खोटी एफआयआर दाखल केली गेली होती. मात्र, डॉ. देशमुख यांनी हा खोटारडेपणा उघड करत सरकारवर दंडाधिकारी चौकशीचे आदेश देण्यास भाग पाडले. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या मदतीने त्यांनी सत्य उजेडात आणले.
डॉ. रियाज़ देशमुख म्हणाले, “महाराष्ट्रात कुठेही अत्याचार झाला, तरी मी अन्यायग्रस्तांसाठी लढेन. समाजवादी पक्षाला बळकट करणे हे माझे ध्येय असेल.”समाजवादी पक्षाला डॉ. देशमुख यांच्या अनुभवाचा आणि लढाऊ वृत्तीचा फायदा होईल. त्यांच्या नियुक्तीने पक्षाला नवा जोश मिळेल, अशी खात्री पक्षनेतृत्वाने व्यक्त केली आहे.