चिखली (हॅलो बुलडाणा/सय्यद साहिल) जवळील वळती येथे 14 जानेवारी रोजी दोन गटांत झालेल्या वैयक्तिक वादातून हाणामारी आणि गोंधळ उडाला. सुदैवाने चिखली पोलिसांनी वेळेवर घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा जातीय धार्मिक तणाव टळला.प्रशांत धनवे यांच्या तक्रारीनुसार, वादाला सुरुवात मोटारसायकलच्या लाईटवरून झाली. नादर खा गुलशर खा (50) याने गोपाल धनवे याला शिवीगाळ करून मारहाण केली. प्रशांत धनवे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण व धमक्या देण्यात आल्या.
यानंतर नादर खाने आपल्या साथीदारांना बोलावून प्रशांत धनवे व गोपाल धनवे यांना लाथा-बुक्क्यांनी तसेच लोखंडी फायटरने मारहाण केली. पोलिसांनी प्रशांत धनवे यांच्या तक्रारीवरून सात आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरद भागवतकर तपास करत आहेत. आरोपींना आज चिखली न्यायालयात हजर केले जाणार आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता, परंतु पोलिसांनी वेळीच कारवाई केल्याने परिस्थिती निवळली आहे.