बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बीड मधील मस्सजोगचे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांच्या रडारवर असलेले आणि बीड येथे पवन ऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणीच्या गुन्ह्यात आरोप असलेली वाल्मिकी कराड बाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. बुलढाण्यात पदोन्नती मिळाल्यावर पुण्यात पोलीस उप महानिरीक्षक म्हणून सारंग आवाड यांनी जबाबदारी सांभाळत असतांना या आरोपीची कसून चौकशी केल्याने वाल्मिकी कराड पोलिसांना शरण आला आहे.ही बाब बुलढाणा साठी देखील गौरवाची म्हणावी लागेल.
बुलढाणा येथे एसपी अरविंद चावरीया यांची बदली झाल्यानंतर 20 ऑक्टोबर 2022 पासून श्री आवाड यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. चांगल्या प्रकारे त्यांनी कर्तव्य निभावले.दरम्यान त्यांना पदोन्नती मिळाली आणि ते पुण्यात पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.दरम्यान बीड हत्याकांड गाजत असल्याने, आवाड यांनी या गुन्ह्यात महत्त्वाची भूमिका निभावली असून कठोर चौकशी केली असता,आरोपीने शरणागती पत्करली. 9 डिसेंबर 2024 रोजी मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात तपास सुरु असतानाच वाल्मिक कराड हे नाव समोर आले. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुनच ही हत्या झाल्याचा आरोप विरोधकांनी केला, त्यानंतर बीडमधील कराडच्या दहशतीचे, अवैध धंद्यांचे, गुन्हेगारीचे असंख्य किस्से समोर येऊ लागले.
राज्याच्या हिवाळी अधिवेशनात संतोष देशमुख हे प्रकरण प्रचंड गाजले, ज्यामध्ये या हत्याकांडाचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे सांगत विरोधकांनी रान पेटवले.राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या आश्रयानेच वाल्मिक कराडची ही गुंडगिरी सुरु असल्याचे आरोप करत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली.याच दरम्यान बीड येथे पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराडवर गुन्हा नोंद करण्यात आला. तेव्हापासून वाल्मिक कराड यांचा शोध सुरु होता.गेल्या काही दिवसांपासून सीआयडीने वाल्मिक कराडच्या कुटुंबियांचीही चौकशी सुरु केली होती, तसेच त्याची बँक खाती गोठवून चांगलीच कोंडी केली होती. सीआयडीने फास आवळल्याने वाल्मिक कराड कोणत्याही क्षणी शरण येईल, असं बोलले जात होते. अखेर त्याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून या प्रकरणात आता पुढे काय कारवाई होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.