चिखली (हॅलो बुलडाणा) सर्वात अधिक रेती तस्करी होत असेल तर ती देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा नदी पात्रातून होत असून,गौण खनिज अधिकारी तथा महसूल अधिकारी यांना ‘लक्ष्मीभेट’ मिळत असल्याने त्यांची बारमाही ‘बंपर दिवाळी’ साजरी होत असल्याची चर्चा सुरू आहे.जवळपास 50 ते 60 बोटींद्वारे रती उपसा होत असून महसूल यंत्रणा दुर्लक्षित आहे.
विधानसभा निवडणूक आचारसंहिता काळात बोटीमार्फत प्रचंड रेती उपसा करण्यात आला. हा रेती तस्करीचा खेळ भर दिवसा आणि रात्री सुरू असतो.इसरूळ ते चिखली मार्गाने
30 ते 40 टन वजनाचा ट्रक भरधाव धावतो.
रेती तस्करीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. महसूल विभागाने अनेक वेळा कारवाया करूनही रात्रीतूनच जिल्ह्यात रेतीचा शिरकाव होतो तरी कसा, हा प्रश्न चर्चचा विषय आहे. अधिकारी आमचेच आहेत, असा रेती वाहतूकदारांचा दावा असतो. अशा वेळी जनतेचा वाली कोण, हा प्रश्न आहे. गौण खनिजाची वाहतूक सूर्यास्तानंतर करणे कायद्याने गुन्हा असताना नियमांना बगल दिली जात आहे. इसरुळ ते चिखली मार्गे सुसाट धावणारे ओव्हरलोड रेतीचे टिप्पर रस्ता पार करीत असताना अधिकाऱ्यांची डोळेझाक कशासाठी, हा प्रश्न अनुत्तरित आहे. रेतीघाटांचा अद्यापही लिलाव झाला नसल्याने अधिकृत उपसा बंद आहे.तरीसुद्धा देऊळगाव राजा तालुक्यातील चिंचखेड, मंडपगाव,दिग्रस या गावांच्या नदीपात्रातून रात्रीतून रेतीची वाहतूक होत असून, याकरीता रेती माफियांचे जाळे सर्वत्र तैनात असल्याची चर्चा आहे. रेती विक्रेत्यांकडून 30 ते 40 टन वजनाचा ट्रक आणला जातो. शहराबाहेर रेतीचे ढीग लावून ट्रॅक्टरद्वारे चिल्लर विक्री व वाहतूक केली जाते. या रेती विक्रेत्यांना प्रशासनाचे अभय असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. रेतीची वाहतूक करताना रॉयल्टी घेऊनच रेती वाहतूक करता येते. घाट ते नियोजित स्थळी रेती वाहतूक करण्याचा नियम असताना, रेतीचे ढीग लावून त्याची विल्हेवाट लावणे गुन्हा असताना, अशाच प्रकारे सर्रास रेती विकली जाते. यामुळे महसूल विभागाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. रेतीची चोरट्या मार्गाने वाहतूक होत असताना प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी अनभिज्ञ का?, असा सवाल ग्रामीण भागातील नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.यामध्ये लोकप्रतिनिधींचे देखील दुर्लक्ष होत असून कमिशनराज बोकाळल्याचे चित्र आहे.