चिखली (हॅलो बुलडाणा) चिखलीच्या आमदार श्वेता महालेंच्या भावाने राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ओबीसी सेलचे सरचिटणीस प्रमोद पाटील यांना प्रचारादरम्यान धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. सावरगाव येथील रहिवासी प्रमोद पाटील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राहुल बोंद्रे यांच्या प्रचारात व्यस्त असताना, श्वेता महालेंचे बंधू त्यांना रस्त्यात थांबवून म्हणाले, “मी तुम्हाला 23 तारखेच्या नंतर पाहून घेईन.”
या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रमोद पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “गेल्या पाच वर्षांपासून चिखलीत दहशतीचे वातावरण आहे. आता या दडपशाही व गुंडशाहीला लोकशाही मार्गाने उत्तर देण्याची वेळ आली आहे.”
घटनेनंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट असून त्यांनी शांततापूर्ण पद्धतीने या घटनेचा निषेध केला आहे. प्रमोद पाटील यांनी जनतेला जात-पात न पाहता या प्रकारांविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
या घटनेवर आ. श्वेता महाले किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. अशाच अनेक प्रकारामुळे चिखली दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून जनतेमध्ये रोष निर्माण झाले आहे