मेहकर (हॅलो बुलडाणा) मेहकर-लोणार मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांच्या प्रचारार्थ शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख मा. उध्दवजी ठाकरे यांनी लोणार येथे जाहीर सभा घेतली. हजारो स्थानिकांच्या उपस्थितीत ठाकरे यांनी भावनिक आवाहन करत “घर सांभाळण्याची परंपरा” जपण्याचे आवाहन केले. “गद्दारीचे रोपटं उखडून निष्ठावान शिवसैनिक रुपी बियाणे पेरा,” असे सांगत त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या शेतकऱ्यांसाठी तीन लाखांपर्यंत कर्जमाफी, महिलांना महिन्याला तीन हजार, आणि बेरोजगार तरुणांना चार हजार रुपये देण्याच्या वचनाचा पुनरुच्चार केला.
महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धार्थ खरातांनी जाहीर सभेत उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाबद्दल आभार मानत, जनतेच्या विकासासाठी, हक्कांसाठी आणि रोजगारासाठी काम करण्याची ग्वाही दिली. यावेळी महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह हजारो कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती.










