spot_img
spot_img

चिखली मतदारसंघात आ. श्वेताताई महालेंना बसणार अॅन्टी इन्कम्बन्सीचा फटका? मतदारांची नावे गहाळ होण्यावरून राहूल बोंद्रे अॅक्शन मोडवर, भाजप डिफेन्सीव्ह!

चिखली (हॅलो बुलडाणा) विधानसभा मतदारसंघाचे बिगुल फुंकल्या गेले आहे. सर्वच राजकीय पक्ष मैदानात उतरण्यासाठी शड्डू ठोकून तयार आहेत. प्रत्येक मतदारसंघात विविध राजकीय पक्षांचे संभावित उमेदवार हे जोरदार फिल्डिंग` लावून तयार आहेत. अशात चिखली मतदारसंघातही पुन्हा एकदा २०१९ प्रमाणेच भाजपच्या विद्यमान आमदार श्वेताताई महाले आणि काँग्रेसचे माजी आमदार राहूल बोंद्रे यांच्यात जोरदार सामना पहायला मिळणार आहे. अशा स्थितीत कोण तुल्यबळ उमेदवार असेल, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. आमदार श्वेताताई महाले यांचा पक्ष गेल्या अडीच वर्षांपासून सत्तेत आहे, मात्र चिखली मतदारसंघात पाहिजे त्या प्रमाणात विकासकामे होत नसल्याने मतदारांमध्ये एक नाराजीचा सूर दिसून येत आहे. यातच विद्यमान सरकारच्या विरोधातील अॅन्टीइन्कम्बन्सीचा फटका श्वेताताईंना बसण्याची शक्यता सध्या तरी दिसून येत आहे.
२०१९ साली राहूल बोंद्रे आणि श्वेताताई महाले यांच्यात जोरदार लढत झाली होती. त्या वेळी खरेतर अनेक निष्ठावंतांना डावलून भाजपने श्वेताताईंसारखा नवखा चेहरा मतदारसंघाला दिला होता. त्यामुळेच हा नवीन चेहरा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलवून टाकेल, अशी सर्वांनाच अपेक्षा होती. नाही म्हणायला श्वेताताईंनी सुरवातीला विकासकामांचा धडाका लावला होता. त्यांचे पती आणि विद्यमान राज्य सरकारमधील एक वजनदार अधिकारी विद्याधर महाले हे देखील त्यांच्या साथीला असल्या कारणाने मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षा प्रचंड उंचावल्या होत्या. अशा उंचावलेल्या अपेक्षांना खरेतर न्याय देणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखे असते. जनतेच्या अपेक्षांची सततची जाणीव ही लोकप्रतिनिधींना असणे गरजेचे असते. मात्र, कधी-कधी सत्तेच्या काळात या जाणिवेवर गंज चढू लागतो आणि मग हळूहळू जनतेचाही भ्रमनिरास व्हायला लागतो.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात झालेला राजकीय भूकंप आणि महाविकास आघाडीचे सरकार, ही घटना श्वेताताईंना सेटबॅक देणारी होती. कारण भाजप-शिवसेनेचे सरकार तेंव्हाच सत्तासीन झाले असते, तर श्वेताताईंसारखा नवखा चेहरा मंत्रिमंडळातही दिसून आला असता. मात्र, श्वेताताईंची अवस्था गड आला, पण सिंह गेला` अशी झाली होती. त्यानंतर अडीच वर्षांनी राज्यात पक्षांची फोडाफोडी करून भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेवर आले, परंतु भाजपच्या वाट्याला मुख्यमंत्रिपद काही येऊ शकले नाही. श्वेताताई महाले या देवेंद्र फडणवीस यांच्या गोटातील आमदार मानल्या जातात. त्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचाही त्यांच्यावर स्नेह आहे. यातूनच मग मतदारसंघात विकासकामे जोमात होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, गेल्या पक्षांची फोडाफोडी आणि अडीच वर्षांत शिवसेना-भाजपच्या सरकारच्या काही धोरणांच्या विरोधात जनतेची नाराजी, तसेच महाविकास आघाडीचे संयोजक शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रति असलेली जनतेची एक सूप्त सहानुभूतीची लाट ही भाजपच्या अनेक आमदारांसाठी मोठी आपत्ती ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आपत्तीच्या भोवऱ्यात श्वेताताई नसतील, हे सांगणे सध्या तरी कठीण आहे.
दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा बोलबाला दिसून आला. राज्यातील सर्वाधिक खासदार हे काँग्रेसचे निवडून आले. तसेही विदर्भ हा एकेकाळी काँग्रेसचा गड मानला जातो. राहूल बोंद्रे हे तुल्यबळ उमेदवार मानल्या जात आहेत. मागील निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राहुल बोंद्रे यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. अनेक मुद्द्यांवर त्यांनी सरकारला धारेवर धरले आहे. अनेकदा राहूल बोंद्रे आणि श्वेताताई यांच्यातील संघर्ष हा रस्त्यावरदेखील पहायला मिळाला आहे. काँग्रेसची वाढती ताकद, राहूल बोंद्रेंचा जनसंपर्क यामुळे यंदाच्या निवडणुकीत निकालाचे पारडे कुणाकडेही झुकू शकते, अशी स्थिती आहे.
श्वेताताईंबद्दलची नाराजी ही उघडपणे दिसून येत नसली, तरी एकूणच भाजपच्या विरोधात गेलेले जनमत हे श्वेताताईंसाठी डोकेदुखी ठरू शकते. नाही म्हणायला हरियाणामध्ये भाजपने ऐन वेळी निकालाचे पारडे फिरवले. परंतु असे निकालाचे पारडे महाराष्ट्रातही फिरेल, असे आज तरी कोणी छातीठोकपणे सांगू शकत नाही. त्यामुळे श्वेताताईंना ही निवडणूक सोपी जाणार नाही, हे निश्चित आहे. काही दिवसांपूर्वी फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीत राज्यात व्होट जिहाद` झाल्याचे एक अफलातून विधान केले होते. त्यातून एका समाजातील नागरिक चांगलेच दुखावले गेलेले आहेत. अशातच चिखली मतदारसंघातून एका विशिष्ट समाजातील मतदारांची नावे गहाळ होण्याचा प्रकार अतिशय गंभीर आहे. यावरून आता भविष्यात रणकंदन होणार हे निश्चित. परंतु अशाप्रकारे एका समाजाला सातत्याने दुखावणे, त्यांची नावे गहाळ होणे याचे खापर पर्यायाने भाजपच्याच माथी फुटू शकते. त्याचाच फटका श्वेताताईंना बसण्याची शक्यता आहे. ही निवडणूक जिंकायची असेल तर श्वेताताईंना खूपच जोर लावावा लागणार आहे. कारण या वेळेसची समीकरणे २०१९ पेक्षा खूपच बदलली आहेत. काँग्रेस एक तुल्यबळ प्रतिस्पर्धी म्हणून समोर आली आहे. यातच राहूल बोंद्रे सारख्या मातब्बर उमेदवाराशी लढत द्यायची म्हणजे सोपे नाही. त्यामुळे या निवडणुकीत कुठल्याही निकालासाठी मतदारसंघातील नागरिकांना तयारी ठेवावी लागणार आहे, हे निश्चित.

क्रमशा: 

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!