बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अधिकार आणि खुर्चीचा अहंकार असलेले अनेक रावण शासकीय कार्यालयात वावरताहेत तर काही बकासूर गलेलठ्ठ पगार घेऊनही कर्तव्यात कसूर करून फुकटाचा पैसा गिळंकृत करताहेत. एखाद्याने आवाज बुलंद केला तर त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवून साम-दाम-दंड-भेद वापरून घाबरविल्या जाते. त्यामुळे असत्यावर सत्याचा विजय दुरापास्त झाला असून खऱ्या अर्थाने विजय दशमी केव्हा साजरी होणार? असा प्रश्न एका कंत्राटदाराच्या आरोपावरून निर्माण झालाय.
बुलढाणा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातील 4 अधिकाऱ्यांनी एका कंत्राटदाराचे टेंडर पास केले परंतु अर्धा पैसा देऊन उर्वरित पैसा देण्यासाठी डावललेच नाही तर खोटे गुन्हे दाखल करून जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिल्याचा आरोप पीडित कंत्राटदाराने केलाय. गणेश रामधन शिंदे असे पीडित कंत्राटदाराचे नाव आहे. त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने 2022 ला झेरॉक्सचे टेंडर मिळाले होते.शिंदे यांना सुरुवातीला पैसे मिळाले परंतु मार्च महिन्यापासूनची त्यांची 4 ते साडेचार लाखांची बिलं थकीत आहे. कार्यालयाच्या वारंवार वाऱ्या करुनही आणि विनंत्या करून देखील काढण्यासाठी टाळाटाळ करीत असल्यामुळे पीडित तक्रारदार गणेश शिंदे यांनी
सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात माहितीचा अधिकार टाकून कार्यालयातील कामे व बिले याबाबतची माहिती मागितली होती.परंतु त्यांच्या माहितीच्या अधिकाराला केराची टोपली दाखविण्यात आली.उलट
त्यांच्यावर कनिष्ठ अभियंता सुभाष राऊत,लिपिक प्रभू गारोळे,एल ओ चव्हाण,बिजवे मॅडम भंडारपाल यांनी पोलिस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप गणेश शिंदे यांनी ‘हॅलो बुलढाणा’कडे ऑन कॅमेरा केला आहे.त्यामुळे वरिष्ठांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.