spot_img
spot_img

राजा कायम; पावसाचा ‘अनपेक्षित खेळ’ – भेंडवळची ३५० वर्षांची घटमांडणी जाहीर!

जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा / ज्ञानदेव राजनकर) तालुक्यातील भेंडवळ येथे ३५० वर्षांची परंपरा असलेली घटमांडणी यंदाही ठळक इशारे देत समोर आली असून, “राजा कायम पण परिस्थिती आव्हानात्मक” असा ठसा या वर्षीच्या भाकितातून उमटला आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर रविवारी सायंकाळी मातीमध्ये रुजलेली ही घटमांडणी सोमवारी पहाटे भाकितांच्या रूपाने उगवली आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षा-आकांक्षांना नवा दिशा दिला.

वाघ कुळातील चंद्रभान महाराज यांनी जाहीर केलेल्या या भाकितात कृषी, पर्जन्यमान, अर्थकारण आणि राष्ट्रीय सुरक्षेपर्यंत सर्व बाबींचा वेध घेण्यात आला. यंदा कापूस, बाजरी, तांदूळ आणि तीळ पिकांसाठी सकारात्मक संकेत देण्यात आले असून, ज्वारीही सर्वसाधारणपेक्षा चांगली राहणार असल्याचा अंदाज आहे. मात्र तूर, वाटाणा आणि लाख पिकांबाबत अनिश्चितता व्यक्त करण्यात आली आहे, तर उडीद आणि भादली पिकांवर रोगराईचे संकट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. जवस पिकासाठी नासाडीचे स्पष्ट संकेत असल्याने शेतकऱ्यांनी सावध राहण्याची गरज आहे.

पावसाच्या बाबतीतही यंदा अस्थिर चित्र समोर आले आहे. जूनमध्ये कमी पाऊस, जुलैमध्ये काहीशी वाढ, तर ऑगस्टमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. सप्टेंबरमध्ये अवकाळी पावसाची शक्यता असल्याने खरीप हंगामात नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

देशाच्या संरक्षण व्यवस्थेबाबत सकारात्मक संकेत असले तरी परकीय तणाव आणि आर्थिक स्थिती चिंताजनक राहणार असल्याचे भाकीत करण्यात आले.

भेंडवळची ही पारंपरिक घटमांडणी शेतकऱ्यांसाठी केवळ श्रद्धेचा विषय नसून आगामी हंगामाच्या निर्णयांचे दिशादर्शन करणारा ‘नैसर्गिक आराखडा’ मानला जातो.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!