बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आज पशुसंवर्धन विभाग बुलढाणाच्या वतीने आयोजित केलेल्या जागतिक रेबीज दिनानिमित्त भव्य मोफत अँटी रेबीज लसीकरण, जंत,गोचीड निर्मूलन शिबिर पार पडले.शिबिरामध्येश्वान 43 मांजर 17 असे एकुण 60 प्राण्यांचे लसीकरण करण्यात आले.दरम्यान रेबीजप्रती लोकांमध्ये व्यापक जागरूकता निर्माण करण्यात आली आहे.
समाजामध्ये रेबीजबाबत प्रचलित गैरसमज दूर करून, लोकांची धारणा बदलून रेबीजप्रती लोकांमध्ये व्यापक जागरूकता करणे गरजेचे आहे. २०३० पर्यंत रेबीज आजाराचे निर्मूलन करण्यासाठी एफएओ, ओआयई आणि डब्ल्यूएचओ या जागतिक संघटनांनी एकत्रितपणे जागृती वाढवण्यावर भर दिला आहे. आरोग्य विभागाने राष्ट्रीय रेबीज नियंत्रण कार्यक्रम हाती घेतला आहे. राज्यात महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने विविध शासकीय विभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने २८ सप्टेंबर २०२४ ते २८ सप्टेंबर २०२५ पर्यंत वर्षभर रेबीज जनजागरण मोहीम राबविण्याचा संकल्प केला आहे.या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात भव्य मोफत अँटी रेबीज लसीकरण, जंत,गोचीड निर्मूलन शिबिर आज पार पडले.
रेबीज हा १०० टक्के जीवघेणा आजार असून यावर उपचार उपलब्ध नाही परंतु हा आजार १०० टक्के टाळता येतो असे तज्ञांनी सांगितले.सहायक आयुक्त पशुंसवर्धन डॉ.पाचरने आणि डॉ.गजानन जाधव डॉ.नागेश परिहार यांनी सदर शिबिर यशस्वी पार पाडले आहे.
▪️पशुसंवर्धन विभाग काय सांगते ?
रेबीज हा श्वान व मांजर सारख्या पाळीव प्राण्यापासून मनुष्याला होणारा संसर्ग जन्य आजार आहे.कुत्रा व मांजर सारख्या पाळीव प्राण्यापासून चावा घेतल्याने रेबीज व्हायरसचा प्रादुर्भाव माणसाला होऊ शकतो म्हणून आज रेबीज जागतिक दिनी सर्व पाळीव प्राणी संगोपन करणाऱ्या पशुपालकांना आवाहन करण्यात येते की वर्षातून एकदा रेबीजचे लसीकरण करावे असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
▪️रेबीज आजार कोणाला होतो?
गरम रक्त असणाऱ्या मानवासह सर्व प्राण्यांमध्ये रेबीज आजार होतो. श्वान (कुत्रा), कोल्हे अधिक संवेदनक्षम आहे.
गाई-म्हशी, शेळ्या-मेंढ्या या मध्यम संवेदनाक्षम आहेत. लांडगे, मांजर,सिंह, मुंगूस, वटवाघूळ, माकड इत्यादी प्राण्यांनाही हा आजार होतो.
आजाराचे प्रमाण मादीपेक्षा नर श्वानांत अधिक आहे. हा आजार मादीत प्रामुख्याने माजावर येण्याच्या कालावधीत अधिक प्रमाणात होतो.