चिखली (हॅलो बुलडाणा) 19 सप्टेंबरला बुलढाणा येथे विविध महापुरुषांच्या पुतळ्यांच्या अनावरण प्रसंगी माननीय मुख्यमंत्री आले होते. ही संधी साधून माननीय मुख्यमंत्री यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन द्यावे यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे व त्यांच्यासोबत इतर काँग्रेस नेते, माननीय मुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमात बुलढाणा येथे आले असता व त्यांनी माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन देण्याचा आग्रह धरला असता, पोलिसी बळाचा वापर करून त्यांना अडवण्यात आले व शेतकऱ्यांच्या मागण्यांचे शेतकऱ्यांच्या रक्ताने लिहलेले, शेतकऱ्यांचे निवेदन पोलिसांकडून फाडून टाकण्यात आले. अशाप्रकारे मग्रुर सरकारने शेतकऱ्यांच्या रक्ताचा अपमान केला आहे. पोलीस प्रशासनाने हे अनावश्यक बळाचा वापर करून अतिशय शांततेने आंदोलन करण्याचा किंवा फक्त निवेदनाचा आमचा हक्क हिरावून घेतला आहे, याचा निषेध म्हणून, जर सोमवार पर्यंत राज्याचे गृहमंत्री व पोलीस प्रशासनाने याबाबत माफी मागितली नाही तर येत्या सोमवारपासून माजी आमदार राहुलभाऊ बोन्द्रे यांच्या नेतृत्वात शेतकरी बेमुदत अन्नत्याग करण्याचे नियोजित आहे. बेमुदत अन्नत्याग करताना खलीलप्रमाणे प्रमुख मागण्या राहणार आहेत.
• पोलिसांकडून शेतकऱ्यांवर दडपशाही करणाऱ्या गृहमंत्र्यांनी माफी मागावी.
• शेतकऱ्यांचे रक्ताचे पत्र फाडणाऱ्या पोलीस प्रशासनाने शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी.
• सोयाबीनला ७००० रु. भाव मिळालाच पाहिजे.
• शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे.
• थकलेला पिकविमा मिळालाच पाहिजे.
• थकलेले सिंचन अनुदान मिळालेच पाहिजे.
• शेतात दिवसा वीज मिळालीच पाहिजे.
• वन्यप्राण्यांपासून संरक्षण मिळालेच पाहिजे