बुलढाणा (हॅलो बूलढाणा) चिखलीत गणेश विसर्जन मिरवणूक एवढ्या उत्साहात काढण्यात आली की,जबाबदार लोकप्रतिनिधी असलेल्या आमदार श्वेता महाले देखील गणेश भक्तीत तल्लीन झाल्या होत्या.या उत्साहाच्या भरात उत्साही तरुणांनी शासनाचे नियम पायदळी तुडवत बंदी असलेल्या लेझरलाईट्सचा सर्रास वापर करून मनसोक्त गुलाल उधळत डिजेच्या कर्णकर्कश आवाजातील गाण्यांवर बाप्पांना निरोप दिला.
गणेश उत्सव सुरू होण्यापूर्वीच प्रशासकीय यंत्रणेने रासायनिक गुलाल व डीजे वाजविण्यावर तसेच लेझर लाईटच्या वापरावर बंदी घातली होती. पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे व कायदा व सुव्यवस्थेचे भान राखण्याचे आवाहन करण्यात आले होते.या संदर्भातील आदेश जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी निर्गमित केला होता. दरम्यान या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने जनजागृती करून कारवाईचा इशारा देखील दिला होता. दरम्यान साखरखेर्डात एका विक्रेत्यावर गुलाल साठवणूक केल्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला.परंतु चिखली येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत या सर्व आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली.गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळी भाजपाच्या आमदार श्र्वेता महाले गणेश भक्तांचा उत्साह वाढविण्यासाठी विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.त्यांच्या समोर गणेश मंडळाचे कार्यकर्ते सदर नियमांचे उल्लंघन करीत होते.परंतु याकडे त्यांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले आहे. पोलिसांच्या कारवाईच्या इशाऱ्याला नजुमानता डीजेचा दणदणाट सुरु होता.लेझर लाईटचा प्रकाशझोत डोळे दिपवत होता. गुलालाची उधळण होत होती आणि स्टेजवर आमदार श्वेता महाले गणेश भक्तांना प्रोत्साहित करीत असताना कानठळ्या बसत असल्याने एक वृद्ध भाविक हाताची दोन्ही बोटे कानात घालून निमुटपणे त्रास सहन करत असल्याचे एकंदर चित्र होते. त्यामुळे गणेश विसर्जन शिस्तीत पाहू इच्छिणाऱ्या अनेक सुजाण भाविकांनी या प्रकाराला सत्तेची मस्ती म्हणून संबोधले.आमदाराचे पाठबळ असल्यामुळे गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये डीजे,गुलाल, लेझर लाईट वापराचे धाडस आल्याचे म्हटल्या जात होते. सार्वजनिक नियमांचे पालन करणे व शासनाचे आदेश पाळण्याचा विसर आमदारांनाच पडत असेल तर सर्वसामान्यांचे काय ? काही प्रश्न उपस्थित झाला होता. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला धुडकावून शासनाच्या नियमांची पायमल्ली करणे म्हणजे अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधी दबाव तंत्राचा वापर करीत असल्याचे यातून निष्कर्षित होते.त्यामुळे
हा सत्तेचा दुरुपयोग नाही का ? असाही प्रश्न यावेळी काही भाविकांनी उपस्थित केला होता.