spot_img
spot_img

एका थेंबात १५३ जीव… बुलढाण्यात रविवारी माणुसकीने रक्तदान केलं!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) कधी विचार केलाय का? एखाद्या रुग्णालयात कुणाचं तरी ऑपरेशन सुरू असतं. बाहेर कुटुंबीय देवाला हात जोडून उभे असतात. डॉक्टर बाहेर येऊन फक्त एकच वाक्य बोलतात “रक्त हवंय, लवकर आणा.” त्या क्षणी रक्ताची एक बॅग म्हणजे फक्त रक्त नसतं, तर एक संपूर्ण कुटुंबाची आशा असते.

 

याच रक्ताचे महत्त्व जाणून असलेल्या संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या रक्तदान शिबिरात २९ नोव्हेंबरला बुलढाण्यात अशाच १५३ आशा तयार झाल्या अन् शिबिरात १५३ जणांनी रक्तदान केलं. म्हणजे १५३ वेळा कुणाच्यातरी आईला, कुणाच्यातरी बापाला, कुणाच्यातरी लेकराला नवा जीव मिळण्याची शक्यता निर्माण झाली.

“चला, कुणासाठी तरी जगा!” ही
रविवारी सकाळी ८ वाजता शहरातून निघालेली रॅली किंवा एक मिरवणूक नव्हती. ती एक हाक होती..
हातात फलक, चेहऱ्यावर शांतता, आणि चालण्यात शिस्त. अध्यात्माचा संदेश घेऊन निघालेली ही रॅली जिथून गेली, तिथे लोक थांबून पाहत होते. आणि काहीजण थांबले नाहीत, थेट रक्तदान करायला मैदानाकडे वळले. जिजामाता प्रेक्षागारासमोरील मैदानावर हेच चित्र दिसलं. कुणी पहिल्यांदाच रक्त देत होतं, कुणी घाबरत होतं, कुणी हसत हसत रक्त देत होतं. पण सगळ्यांच्या डोळ्यात एकच भाव होता तो ”आज मी कुणासाठी तरी काहीतरी केल्याचा!”आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. जिल्हा संयोजक शालिकराम चवरे यांनी मिशनचे कार्य उलगडून सांगितले. सूत्रसंचालन सुभाष राजपूत यांनी केले, आभार हनुमान भोसले यांनी मानले.

▪️बाबांचा विचार, आजच्या पिढीच्या हातात!

निरंकारी बाबा हरदेव सिंहजी महाराज यांचा तो विचार आजही प्रत्येकाच्या मनात घर करून आहे “रक्त रस्त्यावर सांडायचं नाही, ते माणसाच्या धमन्यांमध्ये वाहायला हवं”
सद्गुरु सुदिक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हीच परंपरा जगभर सुरू आहे. आणि बुलढाण्यातल्या सेवादल बंधू-भगिनींनी ती परंपरा अगदी मनापासून जपली.

▪️संत निरंकारी मिशन मानवतेचे प्रतीक : आ. गायकवाड

जात -धर्म -पंथ बाजूला ठेवून अध्यात्माच्या माध्यभातून संत निरंकारी मिशन मानवतेचे कार्य करीत आहे. युवापिढीसाठी संत निरंकारी मिशनची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. मिशनचे कार्य समाजाला प्रेरणा आणि दिशा देण्याचे काम करीत असल्याने संत निरंकारी मिशन म्हणजे मानवतेचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन आमदार संजय गायकवाड यांनी केले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!