देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) जिल्ह्यात पाण्यासाठी वणवण सुरू असताना संत चोखासागर (खडकपूर्णा) धरणाच्या गेटमधून दिवस-रात्र पाणी गळत आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून ही गळती सुरू असून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. एवढा काळ उलटूनही गेटची दुरुस्ती का झाली नाही, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
खडकपूर्णा धरण बुलढाणा, सिंदखेडराजा आणि देऊळगाव राजा या तीन शहरांच्या पाणीपुरवठ्याचा महत्त्वाचा आधार आहे. यंदा पावसाने पाठ फिरवल्याने ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली आहे. शेतकरी उभी पिके वाचवण्यासाठी झगडत आहेत. अशा वेळी तीन शहरांसाठी मोलाचा असलेला पाणीसाठा गेटमधून वाहून जात असेल, तर प्रशासनाच्या पाणीबचतीच्या नियोजनाचा उपयोग काय?
गळतीतून नेमकं किती पाणी जातंय, याची मोजणी झाली का? गेटची शेवटची पाहणी कधी झाली? दुरुस्तीला कोणता अडथळा आहे? दुष्काळात नागरिकांकडून पाणी जपून वापरण्याची अपेक्षा केली जाते. मग धरणातलंच पाणी वाहून जात असताना गळती रोखण्याची जबाबदारी कोणाची, याचं उत्तर संबंधित विभागाने द्यावं.
पुढील काळात तिन्ही शहरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याआधी संबंधित विभागाने गेटची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दुरुस्ती होईपर्यंत गळती कमी करण्यासाठी कोणती उपाययोजना करता येईल, याचाही विभागाने तातडीने निर्णय घ्यावा. गळतीचे प्रत्यक्ष प्रमाण आणि दुरुस्तीची निश्चित तारीख प्रशासनाने जाहीर करावी. कारण दुरुस्तीला लागणाऱ्या प्रत्येक दिवसाची किंमत धरणाच्या पाणीसाठ्यातून मोजावी लागत आहे.






Total Users : 3838042