मेहकर (हॅलो बुलढाणा) मेहकर-लोणार अंजनी खुर्दमध्ये विवाह आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी हक्काची जागा उभी राहणार, तर चिंचोली बोरेत स्मशानभूमीच्या विकासासह सिमेंट रस्ता होणार! मेहकर-लोणार मतदारसंघातील या दोन्ही गावांत रविवारी, २९ नोव्हेंबर रोजी आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते चार विकासकामांचे भूमिपूजन झाले. या कामांसाठी एकूण ३४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
लोणार तालुक्यातील अंजनी खुर्द येथे मुस्लिम समाजासाठी अल्पसंख्याक विकास निधीतून १५ लाखांचा शादीखाना बांधण्यात येणार आहे. विवाहसोहळ्यांसह सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी गावात सुसज्ज जागा उपलब्ध होणार आहे. याच गावातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळा परिसराच्या सुशोभीकरणासाठी आमदार स्थानिक विकास निधीतून ५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. या कामाचेही खरात यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.
मेहकर तालुक्यातील चिंचोली बोरे येथे स्मशानभूमीच्या विकासकामासाठी १० लाख रुपये, तर राजगुरू सर यांच्या घरासमोरील सिमेंट रस्त्यासाठी ४ लाख रुपये आमदार स्थानिक विकास निधीतून मंजूर झाले आहेत. स्मशानभूमीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. सिमेंट रस्त्याच्या बांधकामालाही सुरुवात झाली असून, त्यामुळे या भागातील रहिवाशांची ये-जा सुलभ होणार आहे.
सर्व समाजांचा सन्मान राखत गावागावांतील मूलभूत सुविधा सक्षम करणे आणि विकासाचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे, हा आपला संकल्प असल्याचे आमदार खरात यांनी सांगितले.
अंजनी खुर्द येथे सरपंच, मुस्लिम समाजबांधव, दत्ता भोकरे, हनुमान भोकरे, संजय शेळके, हर्षल गायकवाड, दत्ता गायकवाड आणि छोटू मिसाळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. चिंचोली बोरे येथे सरपंच सतीश पाटील, भास्करराव गारोळे, राजगुरू सर, राजूभाऊ गोरे, दीपक राजगुरू, सुभाष पाटील बोरे आणि सुमंता पाटील बोरे यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






Total Users : 3840159